Tuesday, January 27, 2009

जंबो ट्रेक डिसेंबर २००८

डिसेंबर लागला की दरवर्षीप्रमाणे जंबो ट्रेकचे वेध लागतात. मागच्या वर्षी केलेल्या साल्हेर- मुल्हेर- मांगी-तूंगी ट्रेकच्या आठवणी आजून ताज्या होत्या. लगेच फोनाफोनी , मेल्स चालू झाल्या. रोहीडा - रायरेश्वर -चंद्र-मंगळ - कावळ्या- रायगड असा ट्रेकचा बेत आखला गेला. त्यात फेरफार होत शेवटी वैराटगड > पांडवगड > कमळगड > चंद्रगड > मंगळगड > कावळ्या > रायगड हा मार्ग पक्का झाला. या मार्गासाठी गुगल मॅप, पुस्तके, इतर भटके यांच्याकडून माहिती गोळा केली. चेतन, केतन,अतूल, क्रिश(गजानन), राहूल (पुणे) ,शैलेश (ठाणे), योगेश (बदलापुर), देवर्षी (डोंबिवली) हे मेंबर्स ठरले.
२४ डिसेंबरला रात्री ८.३० वाजता स्वारगेटला जमून ९.०० ची वाई बस पकडायचे असे ठरले होते. नेहमीप्रमाणे उशीर करत करत सर्व जण ११.०० वाजता जमले.क्रिश रिसेप्शन मधून थेट आला तर अतुल १ तास आँन द वे होता. शेवटी रात्री ११.३० ला सातारा बस पकडली व १.१५ ला पाचवड येथे उतरलो.
२५.१२.०८
गुरुवार
पाचवडपासून वैराटगडला जाण्यासाठी पाचवड - वाई मार्गावरील कडेगाव येथे उतरावे लागते. पाचवडपासून सकाळी वाई बस पकडून वाईला पोहचलॊ. येथे आल्यावर समजले की कडेगाव पाचवडपासून जवळच आहे, परत गाडी पकडून कडेगावला पोहचलो. येथून व्याजवाडी गाव सुमारे ४ किमी अंतरावर आहे. व्याजवाडी गावात पोहचून सॅक एका दुकानात ठेवल्य़ा व गावकऱ्यांना वाट विचारुन ०८.१५ वाजता गड चढण्यास सुरुवात केली.’ त्या झाडाच्या दिशेने जाउन मग आडवे जा. ’ असा सल्ला घेउन वाटचा सुरु झाली. ही वाट आहे, अरे ही नाही, अजुन त्यादिशेला जाउया असे सल्ले सुरु झाले. थोड्या वेळात एक ठळक वाट सापडली हिच वाट आहे हे नक्की करून झपझप पावले टाकू लागलॊ. अगदी छोटासा दिसणार हा किल्ला चढतांना मात्र दमछाक करत होता. घसाऱ्यावरून घसरत वरती पोहचलॊ. (०९.३०) प्रवेशद्वाराला पोहचण्याआधी पायऱ्यांच्या डाव्या हाताला पाण्याची सातआठ टाकी आहेत. गडाचे प्रवेशद्वार भग्नावस्थेत आहे गडावर नव्याने बांधलेले शंकराचे मंदीर आहे व एक घर आहे. पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. हा गड शिलाहार कालीन असून साधारणत: १२०० च्या आसपास बांधण्यात आला असावा. गडाचा माथा लहान आहे अर्ध्यातासात गड पाहून पूर्ण होतो. संपुर्ण गडाभोवती जवळ्पास ६ फुटी तटबंदी असावी आता मात्र या तटबंदीचे जोतेच शिल्लक आहेत. गडाच्या माथ्यावर मोठे झाड आहे त्याखाली अनगड देव आहे. येथे आम्हाला कापशीची ( व्हाईट शोल्डेड काईट) जोडी दिसली त्याचे छान फोटो सेशन झाल्याव पुऱ्यांचा नाष्टा केला. पोट्पुजा झाल्यावर गड उतरू लागलो. येतांना घसाऱ्याने मात्र खुप त्रास दिला. मधल्या टप्प्यावर विश्रांती घेतांना हि़दू -मुसलमान, धर्म देव-देवता यावर मौलिक चर्चा झाली.
गावात परत आल्यावर (१२.०० वा) सँक मधील सामनाचे समान वाटप झाले. परत तंगडतोड करत कडेगाव स्टँडवर येउन वाई बस पकडली.
पांडवगडला जाण्यसाठी किरुंडे बस ३.०० वाजता मिळाली तो पर्यत एस टी स्टँडवर आराम केला.मेणवली येथे २० मिनीटात पोहोचलो. किल्ल्याच्या रस्त्याची चौकशी करत पुढे गेलॊ. पुढे फडके यांच्या घरात सॅक ठेवल्या व किल्ल्याकडे वेगात निघालो.(४.१५ वा ) परत वाटांच्या आट्यापाट्या खेळत गडावर जाणारी मुख्य वाट शोधली. पहिले टेकाड चढून आल्यावर किल्ल्याकडे पाहीले तो अपेक्षेपेक्षा जास्त दुर वाटत होता. अतिशय सोपा वाटणारा पांडवगड तसा बराच उंच आहे. मधल्या माचीवर क्रिशला बरे वाटत नसल्याने त्याला मंदिरापाशी थांबवून बाकीचे मेंबर्स सुर्यास्ताआधी गडमाथा गाठायचा या ईर्षेने झपाट्याने निघाले. गडाच्या प्रवेशद्वारापाशी "हा किल्ला आणि माची खाजगी मालमत्ता आहे" अशी चिड आणणारी पाटी आहे. कोण्या एका पारश्याने या सात/बाराच्या उताऱ्यावर स्वत:चे नाव लावले आहे. सर्व गडप्रेमींनी व भटक्यांनी या गडावरील राबता वाढवायला हवा जेणेकरून अशा गोष्टींना वचक बसेल. याच काय सर्वच गडावर वावर हवा जेणे करून ते Pvt. Ltd. होणार नाहीत. नाहीतर काही दिवसांनी आपल्याला किल्ले बघायला परवानगी घ्यावी लागेल आणि फी द्यावी लागेल. गडावर प्रवेश केल्यावर उजव्या हाताच्या रस्त्यावर पाण्याचे टाके आहे विराटगडाप्रमाणे हा गडसुद्धा शिलाहार कालीन असून साधारणत: १२०० च्या आसपास बांधण्यात आला असावा. हा गडावर गेल्यावर त्या पारश्याच्या माणसाने ’आम्हाला गडावर बघण्यासारखे काही नाही, गडावर बिबळ्याची जोडी फिरते, डुकरांची सार आहे’ असे सांगुन घाबरवण्याचा प्रयत्न केला. परंतू BBC वार्ताहार निरज, याने "फक्त वाघ? ते जाउद्या अजुन कोणकोणते प्राणी दिसतात" असे विचारून त्याची हवा काढली. त्याने त्याचे इतरही बौद्धिक घेतले. सुर्यास्त होण्यात आल्याने गड सोडला येतांना अर्ध्या वाटेवरच अंधार पडला. घसरणीच्या वाटेने जायचे नसल्याने खिंडीतील लांबच्या वाटेने गावात परतलो. (८.०० वा ) येतांना मात्र सश्याचे दर्शन झाले. फडक्यांकडुन सॅक घेउन गावाकडे परततांना वाटेत सरपंच भेटले त्यानई आस्थेने चौकशी करुन शाळेची खोली राहण्यास उघडुन दिली. परंतू उशीर झाल्याने गावात जेवणाची सोय होऊ शकली नाही त्यामूळे ’भातमॅन’ क्रिशला साधाभात करण्यास सांगितले परंतू क्रिशने ’बनवेन तर मसालाभातच बनवेन, साधाभात नाही ’ अशी घोर प्रतिज्ञा केल्याने चेतनने साधा भात बनवला व त्यासोबत रेडी टू कूक भाजी बनवली जेवण झाल्यावर दिवसभराच्या श्रमाने सर्व लगेच झोपले
२६.१२.०८
शुक्रवार
सकाळी लवकर उठायचे असे ठरवूनही सगळे ७.०० वाजता ऊठले. कमळगडासाठीची वासोळे बस सकाळी ८ वाजता असल्याने घाईघाईत सर्व आवरून स्टॅंडवर येउन उभे राहीलो. या धावपळीत मेणवली या गावातील नाना फडणविसांचा वाडा व कृष्णानदीचा घाट बघायचा राहून गेल्याची रुखरुख लागली होती. स्टँडवर आल्यावर वासोळेसाठी एक जीप तयार झाली. त्याच्याशी थोड गोड बोलून थोडावेळ थांबण्यास तयार केले. नानांचा वाडा व त्यामागील सुंदर घाट पाहीला. या घाटाच्या ठिकाणीच स्वदेश चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. वाडा पाह्ण्याची वेळ सकाळी ९.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत असते.
घाटावर एका मंदिरासमोर वसईच्या लढाईच्या विजयाचे प्रतिक म्हणून आणलेली एक प्रचंड घंटा आहे. या मंदिराच्या पायऱ्यांवर झकास ग्रुप फोटो काढला. वाड्याच्यासमोरच जवळपास ४००वर्ष वय असलेला बाऒबाबचा (गोरखचि़चेचा) प्रचंड वृक्ष आहे. वासोळे गावाचा रस्ता धोम धरणाच्या जलाशयाच्या बाजूने फिरत जात होता येथून केजळगडाचे दर्शन होते येथून रायरेश्वर मार्गे जाणार भोर- वाई जोडणाऱ्या रस्त्याचे काम चालू आहे.
कमळगडाच्या एका बाजूला वासोळे गाव आहे तर महाबळेश्वर बाजूला परतवडी गाव आहे परतवडीहुनही वाईला जाणाऱ्या बस मिळतात. वासोळे गावातून कमळगडावर जाउन दुसऱ्याबाजूला परतवडीत उतरायचे असल्याने सॅक घेउनच किल्ला करावा लागणार होता म्हणून गावात मंदिरात जेवून मग निघायचे असे ठरले. खवापोळी-दुध व त्यानंतर चहा असा भरपेट नाष्टा केला. पाठपिशव्या चढवून चालायला सुर्रुवात केली.कमळगडाकडे चालतांना डाव्या बाजूला दिसणारया डोंगराला म्हातारीचे दात किंवा नवरा नवरीचा डोंगर म्हणतात. गाडरस्ता जेथे संपतो तेथे पाण्याची टाकी आहे. मग परत एकदा विश्रांती घेतली. सकाळी राहीलेली इतर कामे उरकून घेतली पाण्याच्या बाटल्या भरून घेउन आता थेट गडावरच थांबायचे असा निश्चय करून चालायला सुरुवात केली पण पाच दिवसाच्या हिशॊबाने सॅकमध्ये सामान असल्याने ते वजन घेउन गड चढणे कठीण जात होते. मग अर्धा तास चालून ५ मिनिट थांबायचे असे ठरले. असे करत करत मध्ये एकदा टॅन्ग साठी ब्रेक घेउन कमळगड - कोळेश्वर खिंडीत ३.०० वाजता पोहचलो. येथे कोळेश्वरपठार तसेच परतवडीहून येणारी वाट लागली खिंडीतून डावीकडे वळल्यावर एक चढ चढल्यावर एक नाथमंदिर लागले येथे एक बाबा राहतात . या मंदिरासमोर उजव्या हाताला पाण्याचे टाके आहे. त्याच वाटेवरून झाडोऱ्यातून पुढे गेल्यावर गडाची माची लागली. येथे एक मोठे घर आहे व शेती आहे. बॅग घरात ठेवून घेण्यास त्यांनी नकार दिला. कदाचीत पुर्वीच्या कोणा ट्रेकर्सचा वाईट अनूभव आला असेल. सॅक समोरच्या झाडाखाली ठेवल्या व गडावर जाण्यसाठी सुसाट निघालो. माथ्यावर जाणारी वाट दाट झाडीतून जाते. एकंदरीतच हा किल्ला घनदाट जंगलाने वेढलेला आहे. कालपासून बालेकिल्ला गाठण्याच्या चुकलेल्या अंदाजामुळे गडावर जाण्यास अर्धातास लागेल असे वाटले पण १५-२०मिनिटातच गडावर जाणार दरवाजा लागला (४.०० वा) गडाचा दरवाजा म्हणजे दोन दगडातून चढणारी वाट आहे पायऱ्या अर्थातच तोडलेल्या आहेत. (गडाची उंची ४५२२ फुट) गडमाथा अतिशय लहान आहे. पण वर आल्यावर समोरच पाचगणी व महाबळेश्वरचे विस्तिर्ण पठार दिसते.गडाच्या तटावरुन आम्ही एक फेरी मारली तटावरून खाली बघत असतांना निरजचा महागडा गॉगल खाली पडला तो कंपनीकडून भेट मिळालेला असल्याने त्याला प्रत्यक्ष तोटा झाला नसला तरी दिलेली भेट अश्यापद्धतीने हरवल्यामूळे तो पुढे पुर्ण ट्रेकभर अपसेट झाला.
गडावर कोणतीही वास्तू शिल्लक नाही पण प्रत्येक भटक्याने आवर्जून पाहीली पाहिजे अशी गोष्ट यावर आहे ती म्हणजे जवळपास १०० फुट खोल पायऱ्या असलेली विहिर. एक ते दिड फुट उ़चीच्या जवळपास ६० पायऱ्या खोदल्या आहेत खाली पाणी असते आम्ही गेलो तेव्हा पाणी शिल्लक नव्हते पण माती ओलसर होती. खाली काव किंवा गेरुची खाण आहे. पाण्यापर्यंत उजेड यावा, उन पोहचावे यासाठी तीन झरोके खोदले आहेत. खोल असल्याने खाली अतिशय गारवा असतो. उन्हाळ्यात तर बाहेरील उष्णता व आतील उष्णता यात जास्त तफावत असल्याने आत उतरल्यावर अंगातून वाफा बाहेर पडतांना दिसतात.
हा किल्ला कोकणातुन वर येणाऱ्या ढवळ्या घाटाचा संरक्षक किल्ला आहे. गडावरून कोळेश्वरचे दाट जंगलाने वेढलेले पठार दिसत होतं, प्रत्येकालाच कोळेश्वरावर जावे असे वाटत होते. पण आमच्या प्लॅननुसार कमळगड - कोळेश्वर खिंडीत येउन डाव्या बाजूच्या वाटेने ”परतवडी’ गावात उतरणार व तेथून रस्त्याने जोर गावात जाणार होतो. समोरच दिसणा-या कोळेश्वर पठाराच्या जंगलातून एक वाट ’जोर’ गावापर्यंत जाते हे माहित होते परंतू ती वाट माहित नसल्याने तसेच संध्याकाळ होत आल्याने त्यामार्गे जाणे वेडेपणाचे होते.
बालेकिल्ल्यावरून उतरून सॅकपाशी आलो (सं ५.१५) तेथे आम्हाला साधूबाबा भेटले हेच बाबा त्या मंदिरात राहतात. त्यांना परतवडीत जायचे असल्याने ते पण आमच्या बरोबर निघाले, लगेच निरजने त्यांचा ताबा घेतला "बाबा तुमचे वय काय ? " आणि मग त्यांची मुलाखत चालू झाली आम्हाला ’ जोर ’ गावात जायचे आहे, कोळेश्वर पठार पाहण्याची इच्छा आहे असे बाबांशी बोलल्यावर ते त्यांनी मी तुम्हाला कोळेश्वर मार्गे जोर ला पोहचवतो असे सांगीतले. आम्हाला अतिशय आनंद झाला. परतवडी ला उतरून जोर ला जाण्यापेक्षा कोळेश्वर मार्गे जाण्याने वेळही कमी लागणार होता. त्यांच्या बरोबर जाण्या आधी मंदिरासमोरच्या टाक्याजवळ ब्रेड जॅम चा नाष्टा केला आणि बाबांच्या मागे चालू लागलो बाबांचे नाव गोगावले आहे, त्यांचे वय ८० आहे. बाबांनी मग त्या प्रदेशाचा पौराणिक इतिहास सांगितला धोमच्या परिसरात धौम्य ऋषींचा आश्रम होता त्याचा कमंडलू जेथे लवंडला तेथून धोम नदी वाहू लागली, नाथ संप्रदायातील व्यक्तीही या परिसरात वास्तव्याल होत्या. येथून काही मैलावर असणारे महाबळेश्वर तर प्राचिन काळापासून तिर्थक्षेत्र गणले जाते.
बाबांबरोबर चालतांना आम्हाला दम लागत होता ते मात्र सटासट चालत होते. थोड्या थोड्या वेळाने त्यांना जरा वेळ थांबा असे सांगावे लागे. कोळेश्वरचे पठार अतिशय दाट झाडीने भरलेले आहे. थंडीच्या दिवसात सुर्यास्त लवकरच होत असल्याने आम्हीही जास्तित जास्त वेगाने चालण्याच प्रयत्न करत होतो. या पठावर आम्हाला केवळ चारपाचच घरे लागली बाबा या परिसरात फेमस असल्याने भेटलेले गावकरी बाबा एवढ्या उशिरा कूठे निघालात? असे विचारीत .
थोड्याच वेळात पुर्ण अंधार पडला. सगळ्यांना टॉर्च कंम्पलसरी आहे असे सांगूनही आमच्याकडे ४-५च टॉर्च होते. आहे त्या टॉर्चच्या प्रकाशात आम्ही ठेचकाळत बाबांच्या मागे चालत होतो बाबा मात्र टॉर्च न घेता काठीने झाडी बाजुला करत सपासप चालत होते. मध्येच वाट गुडुप झाली. पण बाबा मात्र रस्त्याच्या बाबतीत निश्चिंत होते. पावसाळ्यामुळे वाट थोडी इकडे तिकडे झाली आहे आपण बरोबर वाटेवर आहोत असे आम्हाला आत्मविश्वासाने सांगत होते व त्याच आत्मविश्वासाने अंधारात चालतही होते.
आम्हाला वाटले की आज रात्र इथेच जंगलातच काढावी लागणार, परिस्थिती फारच विचित्र होती. दाट जंगल, वाट हरवलेली, अमावस्येची रात्र. पण बाबांच्या मागे आगे आम्ही झाडोऱ्यातून ओरबाडून घेत पुढे चालतच होतो. अखेर बऱ्याच वेळाने जोर गावातले दिवे दिसले आम्हाला खुप हायसे वाटले. पण पुन्हा प्रश्न उभा राहिला की हा डो़गर अंधारात उतरायचा कसा गोगावले बाबांना हा प्रश्न पडलाच नाही. अचुक वाट दाखवत ९.४० ला जोरच्या रस्त्याला उतरलो, म्हणजे कमळ्गडाची माची सोडल्यापासून (सं. ५.१५) ९.४० पर्यंत मधला ५-५ मिनिटांचा विश्रांतीचा काळ सोडला तरी जवळ्पास साडेतीन तास कोळेश्वर पठाराच्या जंगलातून धावत होतो. गावात पोहचण्यास एवढा उशीर झाल्याने अर्थातच जेवणाची सोय झाली नाही पण राहण्याची सोय मात्र शाळेत छान झाली. भयानक दमल्यामूळे स्नायूंना आराम मिळावा यासाठी लिडर चेतनने स्ट्रेचींग कसे करायचे ते दाखवले. जेवणाआधी सुप करावे असे ठरले. ठंडीत सुप प्यायल्याने तरतरी आली मग परत भात लावला भात-रेडी टू कुक ची भाजी खावुन झोपण्यास १२.३० झाले.

Thursday, March 27, 2008

Sunday, September 23, 2007

ओनामा

कोणत्याही कामाची सुरुवात करण्यासाठी आपण चांगला मुहुर्त शोधतो. माझ्यासारख्या आळ्श्याला तर ह्याच्यासारख्ये दुसरे चांगले कारण सापडत नाही. तरी शेवटी गणपती उत्सवाच्या मुहुर्तावर अनुदिनी करू म्हणून निश्चय केला आणि विसर्जनाला दोन दिवस राहिले असतांना प्रत्यक्षात आला. असो एकदाची अनुदिनी सुरु केली हेही नसे थोडके.